दुसरी बाजू
लेखक - हृषीकेश जोशी
छाप आणि काटा असा खेळ लहानपणी आपण प्रत्येकाने कधी ना कधी निर्णय घेताना खेळलेला असेलच. हा प्रसंग तेव्हाच उद्भवतो जेव्हा दोनही व्यक्तींना आपलेच मुद्दे योग्य आहेत असं वाटतं असत. आणि कोणीही मागे हटायला तयार नसत. मग अशावेळी नाणं टाकून येईल तो कौल स्वीकारून पुढं जायचं आपण मान्य करतो. त्यावेळी आपण निवडतो की तुझा छापा की माझा काटा म्हणजे त्या नाण्याला दोनही बाजू आहेत हे आपण मान्य करत असतो. आणि नाणं उंच फेकल्यावर जी बाजू येईल तेही आपण नकळत का होईना मान्य करतो. लहानपणी गंमत म्हणून खेळाला जाणारा हा खेळ मोठे होता होता आपण सहज विसरून जातो आणि तितक्याच सहजपणे नाण्याची दुसरी बाजू असते हे देखील विसरून जातो.
प्रत्येक निर्णयाच्या वेळी हा खेळ खेळणे हे योग्य नसते काही निर्णय मोठे असतात, पण नाण्याची दुसरी बाजू ही मात्र आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे , हेच आपल्याला ' दुसरी बाजू ' या पुस्तकात हृषीकेश जोशी यांनी खूप छान सविस्तर सांगितले आहे. हृषीकेश जोशी हे एक कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. यलो , पोस्टर बॉईज असे वेगवेगळे विषयांवरचे सामाजिक आशयाचे चित्रपट त्यांनी केले आहेत. तसेच त्यांनी " नांदी " हे एक प्रयोगशील नाटक ही रंगभूमीवर आणले आहे. समाजाप्रती जाणं असलेला कलाकार या भूमिकेतून ते आपल्याला वेळोवेळी दिसलेले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्यातील समाजाभिमुख, संवेदनशील, विचार प्रवृत्त लेखकही आपल्याला आढळतो. एका मनस्वी, सच्चा कलाकाराची ही दुसरी बाजू पण आपण इथे पाहतो.
ही दुसरी बाजू म्हणजे खरं तर ' दुखरी बाजू ' आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण ती प्रखर वास्तव समोर आणत असल्याने ती नाकारण्याचा सराव झालेला असतो. किंबहुना कोणत्याही गोष्टीवर दोन्ही बाजूने चर्चा घडायला हवी असे कोणाला वाटतं नाही आणि तेवढा वेळ खर्च करण्याची कोणाची तयारीही नसते. चंगळवादाच्या या दुनियेत सार काही झापड लावून चाललेलं आहे. कोणालाही आपल्या (कंफोर्ट झोन) सुरक्षित कोषामधून बाहेर यायचं नसत. आजकाल प्रसार माध्यमे मग ती कोणतीही असोत ती ही एकांगी मत प्रदर्शन करताना दिसतात. एकाच दृष्टिकोनातून विशिष्ट घटनेचा अर्थ काढला जातो. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुद्द्याने सध्या खूपच बाळसे धरले असल्याने घडलेल्या घटनेचा सर्वंकष विचार न करता आपले मत धडाधड सोशल मीडिया वर मांडले जाते. या साऱ्या अतितीयायीपणाने मूळ समस्या सोडवली न जाता ती भरकटते आणि आणखीन नवीन समस्या निर्माण करते. ज्यांना ह्या सुरक्षित कोषातून बाहेर यावंसं वाटत नाही त्यांनी एकदा जर हे पुस्तक वाचले तर त्यांना त्यांच्या विचारात परिवर्तन करावे असे निश्चितपणे वाटू शकते आणि हे या पुस्तकाचे यश आणि लेखकाचे उद्दिष्ट आहे. किंबहुना कोशात गुरफटण्याच्या पद्धतीला हे विचार मंथन आवश्यकच आहे. आज ना उद्या त्यांना या गोष्टीचा विचार करायला लागणार हे निर्विवाद सत्य आहे.
हृषीकेश यांचे एक कलाकार म्हणून त्यांना आलेले अनुभव आणि एक व्यक्ती म्हणून समाजात आलेले अनुभव याचा अतिशय तटस्थपणे, सर्वागाने आणि अभ्यास करून केलेले विचार मंथन या पुस्तकातून जाणवते. यातील विचार हे अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहेत. जणू काही लेखक आपल्या समोर स्वतःच मत सांगत आहे, आपल्याशी संभाषण करत आहे असे जाणवते. यातील काही अनुभव हे आपल्यालाही आलेले असतात पण त्यांच्याकडे बघण्याची जी दृष्टी लेखकाला आहे ती सर्वाना नसते असे पुस्तक वाचताना जाणवते. ज्यांना ही दुसरी बाजू पडताळायची सवय आहे त्यांना ही आपली बाजू या मताशी किती मिळती जुळती आहे ते तपासून पाहण्यात आनंद वाटेल. किंवा आपलेच मत योग्य पद्धतीने व्यक्त झाल्याचा आनंद लाभेल हे नक्की.
यात एकूण १७ निरनिराळ्या सामाजिक विषयांवरील लेखांचा समावेश आहे. सर्वच लेख अतिशय उत्कृष्ट आहेत पण काही लेख हे मनाला जास्त भावतात ते म्हणजे निर्भया ,सगळं जगणं सत्वहीन, पाया , निष्ठा - व्यक्तिगत आणि सामाजिक, रंग ,सामाजिक वर्तनाच तारतम्य, शासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा?, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जपायचं आहे का आपल्याला काही ? , सम्यक इक्षणम, माझा देश, यदा यदा ही धर्मस्य, देव आणि माणूस हे लेख आहेत. या सर्वांची केवळ नावे दिली आहेत त्यांच्या बाबत येथे काहीही सांगणे म्हणजे पुस्तकातील सत्व काढून घेण्यासारखे आहे. तरीही यातील काही वाक्ये हि सहजगत्या आपल्याला जास्त विचारप्रवृत्त करतात. जस पाया लेखामध्ये वाक्य आहे - "पाया भक्कम नसला कि पडझड हि होणारच , मग ती इमारत असो व वैभवशाली साम्राज्य." निष्ठा या लेखात "मूल्यांवरची माझी निष्ठा उडाली कि भ्रष्टाचाराला सुरवात होते . " हे वाक्य अगदी साधे आहे पण ते तितकेच अर्थपूर्ण आहे. अशा सोप्या सहज पण विचारपूर्वक लेखांमुळे दुसरी बाजू किती महत्वाची आहे ते जाणवल्यावाचून राहत नाही.
आयुष्याच्या जीवन प्रवाहात भरकटत चाललेल्या नौकेला बांधून ठेवणारं किंवा सुरक्षित विसाव्याचे ठिकाण म्हणजे हे पुस्तक आहे असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती होणार नाही. गिरीश सहस्त्रबुद्धे यांचे मुखपृष्ठ आणि राजन खान यांची आतील रेखाचित्रे हे देखील विषयाला न्याय्य अशीच झाली आहेत.
Comments
Post a Comment