आणि चिंटू थांबला . . . . . . . . . .
अजूनही आठवतो तो काळा दिवस ज्याच्या उगवण्याने, सर्वांची सकाळ प्रसन्न करणारा चिंटू अचानक निःशब्द, अन एकाकी झाला. ११ जूनची ती सकाळ, अचानक प्रभाकरचा फोन येतो काय आणि त्यानंतर विचारांच्या ही पलीकडे असे एका मागोमाग एक प्रसंग घडतात काय ? सारेच अविश्वसनीय होते. पोटदुखीने अत्यंत त्रस्त झाल्याने प्रभाकरला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्याच्या मामेभावाने युरॉलॉजिची ट्रीटमेंट त्याला दिली. संध्याकाळी बरे वाटल्याने तो घरीही आला पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. परत त्रास सुरु झाल्याने त्याला लगेच दुसऱ्या दिवशी ऍडमिट केले. तेव्हा त्याला पॅरलिसिसचा अटॅक आला. स्क्यानिंग वैगरे करून पाहिल्यावर मेंदूमध्ये काही क्लॉट्स असल्याचे समजले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रभाकर ब्रेन हॅमरेज होऊन गेला. ११ ते १३ जून हे ३ दिवस प्रभाकर, मी आणि आमचा चिंटू परिवार यांच्यासाठी अतिशय दुःखद आणि भविष्याला कलाटणी देणारे ठरले. २२ वर्षांच्या या अतूट मैत्री मध्ये अखेर काळानेच व्यत्यय आणला. हा धक्का मी आणि आमचा चिंटू परिवार यांच्यासाठी खूपच मोठा आणि अनपेक्षित होता. तो पचवण्यासाठी निश्चित काही काळ जाणं हे आवश्यक होत आणि त्यामुळे चिंटूचा प्रवास काही काळासाठी इथे थांबला.
चिंटूचा प्रवास जरी थांबला असला तरी प्रभाकरच्या आणि माझ्या मैत्रीच्या आठवणींचा प्रवास हा थांबवणं शक्य नव्हतं. तो एखाद्या सिनेमाच्या फ्लॅशबॅक सारखा सुरु झाला. चिंटू होण्यापूर्वीची आमची मैत्री, मग चिंटूची निर्मिती, चिंटूला मिळालेली अफाट लोकप्रियता, चिंटूचं पुस्तक, नंतर चिंटूवर बनविलेला सिनेमा, भाषेच्या सीमा पार करून गेलेला चिंटू, परभाषेत चिंटूला मिळणारं स्थान, चिंटूचं कॅलेंडर, चिंटू मुळे निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रमांना येणारं आमंत्रण, अशा एक ना अनेक आठवणी झरझर नजरेसमोरून जाऊ लागल्या.
खरतरं चिंटू निर्मितीच्या ही आधीपासूनचं आमच्यातल्या मैत्रीचा धागा जुळला होता. लहानपणापासूनच व्यंगचित्रांची मला आवड होती, अनेक दिवाळी अंक, इंग्रजी वर्तमानपत्र, कॉमिक्स आणि त्यातील व्यंगचित्रकारांमुळे मला त्यात अधिकाधिक गोडी वाटू लागली. इंग्रजी वर्तमानपत्रात येणाऱ्या स्ट्रिप्स बघून मला नेहमी असं वाटायचं की आपल्या मातीशी संबंध सांगणाऱ्या भारतीय स्ट्रिप्स का बनु नयेत ? आपण एखादं कॅरॅक्टर का तयार करू नये ? आणि या कॅरॅक्टर च्या शोधात असताना मला एक कॅरॅक्टर सापडलं ते म्हणजे प्रभाकर ! आमची ओळख झाली ती व्यवसायाच्या निमित्ताने. माझी ऍड एजन्सी होती त्यासाठी अधून मधून फ्रीलान्स कॉपी राइटिंगचं काम करायला प्रभाकर यायचा. तो दैनिक तरुण भारत मध्ये ऍडव्हरायझिंग सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून काम करत होता. नंतर तो इंडियन एक्सप्रेस येथे गेला. त्यावेळी जाहिराती मागण्यासाठी आल्यावर आमच्यात कार्टून, कॉमिक्स, मॅड मॅग्झिन, टिनटिन कॉमिक्स असे विषय यायचे, चर्चा व्हायच्या. पण काही एकत्र करावं असं घडत नव्हतं. मी माझ्या ऍड एजन्सी बरोबर इतरही बरीच कामे करत होतो. बालभारती इलेस्ट्रेशन, जपानी भाषा शिकणे, तसेच शोभा भागवत, लीला पाटील यांच्या पेरेंटिंग चाईल्ड सायकॉलॉजी यासाठी चित्रे अशा कामात व्यस्त होतो.
एक दिवस प्रभाकर आला आणि मी नोकरी सोडतोय असे म्हणाला. मग म्हंटल चला, आता एकत्र काम करू आणि आमच्या भेटीगाठी, चर्चा होत राहिल्या. एक दिवस त्याने नोकरी सोडायच्या आधी तो त्याच्या ऑफिसच्या कामासाठी आला, तो निघताना दारापाशी असताना मी माझ्या बसल्या जागेवरून टिचकी वाजवून तर्जनी त्याच्याकडे रोखून म्हटलं , "पब्या एका मुलाचं कॅरॅक्टर सुचलंय डेली कार्टून स्ट्रीप करायची का ?" त्यानं तशीच टिचकी वाजवून माझ्याकडे बोट केलं आणि म्हणाला, "चल करू" आणि तो दरवाजा उघडून बोलला ' चल करू ' ही त्या संकल्पनेची सुरवात होती. चिंटू सुरु झाल्यानंतरही दहा-बारा वर्षांनीही तो प्रसंग आम्हा दोघांना तपशीलवार आठवत होता. मग आम्ही चर्चा सुरु केल्या.
गोष्टी घडायच्या असल्या की त्याला साजेशा घटना अगदी आश्चर्यकारकरित्या जुळून येतात. त्याच वर्षीच्या मिळून साऱ्याजणीच्या दिवाळी अंकात मंगला गोडबोलेंच्या कार्टून स्ट्रिप्स चित्रबद्ध करण्याचं काम माझ्याकडे आलं. एक दिवस सकाळ मधून स्वाती राजेंचा फोन आला. त्यांना सकाळ दिवाळी अंकाच्या उरलेल्या जागेत माझ्याकडून काही कार्टून्स हवी होती. कार्टून्स काही तासात हवी असल्याने हीच कार्टून स्ट्रीप काढायची मी ठरवलं. आम्ही तीन-चार स्ट्रिप्स लिहून ठेवल्या होत्या पण कॅरॅक्टरच नाव ठरलॆल नव्हतं आणि तेव्हा मोबाईल नसल्याने प्रभाकरशी संपर्क होत नव्हता. मग मी रात्री उशिरा पर्यंत बसून स्ट्रिप्स तयार केल्या आणि नाव ठेवलं चिंटू. याच्या आधी मी दर रविवारी सकाळ मध्ये एक ऍडव्हेंचर कॉमिक्स करत होतो त्याच नाव होत छोटू. पण हे कॅरॅक्टर त्याच्याही पेक्षा लहान असल्याने मी त्याच नाव ठेवलं चिंटू आणि मग ते याच नावाने प्रिंटीगला दिल, प्रभाकरलाही हे नाव आवडलं. हे प्रकाशित झाल्यावर आम्हाला आत्मविश्वास आला आणि पुढचे काही चिंटू तयार केले. चिंटूची निर्मिती ही अशी झाली आणि मग चालू झाला त्याचा दीर्घकालीन प्रवास.....
पुढे आम्ही दोघे या तयार चिंटूच्या स्ट्रिप्स घेऊन सकाळचे संपादक विजय कुवळेकर यांना भेटायला गेलो. त्यांनी अर्ध्यातासाने परत यायला सांगितलं. या अर्ध्यातासात आमच्या दोघांची चर्चा झाली की ते जर हो म्हणाले तर आपण एक महिन्या दीड महिन्याचा चिंटूचा स्टॉक तयार करून १ जानेवारी पासून सुरु करू. पण अर्ध्यातासाने आम्ही गेलो तेव्हा कुवळेकर म्हणाले, "आम्ही ही मालिका स्वीकारली आहे आणि ती उद्याच्या अंकात छापायला पाठवली आहे." आम्ही गडबडलो, म्हटलं, " आम्हाला थोडी तयारी करायची आहे. थोडा स्टॉक करू द्या ." तर त्यावर ते म्हणाले, " नाही नाही कराल तुम्ही हे". त्यांनी हा जो विश्वास दर्शिवला त्याला आम्ही बावीस वर्षांत एकदाही तडा जाऊ दिला नाही.
याच कारण कदाचित आमची घनिष्ट मैत्रीही असावी. चिंटू मुळे आम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली, हळूहळू लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. अनेक गंमतशीर प्रतिक्रिया आल्या. त्यात मला आणि प्रभाकरला जवळून ओळखणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटायचं की, आम्ही दोघे एकत्र कस काम करु शकतो ? कारण आमच्या दोघांचे स्वभाव अगदी भिन्न होते. प्रभाकरचा स्वभाव भरपूर बडबडा, भरपूर मित्र असणारा, पण काहीसा फटकळ, बोचरा म्हणून प्रसिद्ध, तर माझा अबोल, नेहमी शांत, आणि मोजकेच मित्र असणारा म्हणून प्रसिद्ध. त्यामुळे आम्ही दोघे न भांडता कसे राहू शकतो ? याच लोकांना कोड वाटायचं. पण चिंटूच्या या बावीस वर्षांच्या काळात आम्ही एकदाही भांडलो नाही आणि अजूनही पुढे भांडलो नसतो. चिंटू करताना रोज नवीन कल्पना लागायच्या पण त्या सुचताना कधी आम्हाला अडचण आली नाही किंवा त्यावरून आमच्यात वादही झाले नाहीत. एक से भले दो म्हणून ते उलट आम्हाला जास्त सोपं गेलं असेल असं वाटत. माझा निर्णय अंतिम हे प्रभाकरने सहजगत्या मान्य केलं होत याचही मला आश्चर्य वाटायचं.
चिंटू करायला बसताना मी आणि प्रभाकर इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो. मग कधीतरी एखादा धागा आम्हाला सापडायचा म्हणजे आंब्याच्या झाडाला मोहोर आला असेल तर त्यावरून काही गप्पा व्हायच्या. त्यात लहानपणी आपण कैऱ्या काढण्यासाठी काय काय युक्त्या करायचो. वाड्यात क्रिकेट खेळताना आसपासची लोकं कशी वैतागायची, किंवा शाळेच्या मैदानात एकावेळी कशा चार-चार क्रिकेटच्या मॅचेस चालायच्या. या अशा या गप्पातून एखादा धागा सहजपणे सापडायचा आणि तो खुलवत, फुलवत चित्ररूपाने बाहेर पडायचा.

चिंटूच्या प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हे ठरवलं होत की चिंटू ही मालिका जरी एक मुलावर असली तरी ती फक्त मुलांसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी करायची. त्यानुसार यात वेळोवेळी वेगवेगळी कॅरेक्टर्स येत गेली. आई, पपा, मिनी, पप्पू, राजू, बगळ्या, जोशी काकू, सोनू आणि त्या प्रत्येकाला स्वतःच वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व होत . मिनी ही हुशार, आग्रही, वर्चस्व गाजवणारी मुलगी त्यामुळे ती अनेकांना भांडखोर वाटायची. पप्पू हा चिंटूच्या बालखोड्यात सतत त्याच्या सोबत सहभागी असणारा त्याचा मित्र, राजू आपल्या शारीरिक ताकदीच्या जोरावर सगळ्यांवर दादागिरी करणारा, बगळ्या काहीसा बावळट सगळ्यात उंच म्हणून हे नाव पडलेला, तो सापडायला थोडासा वेळ लागला. लोकांना विशेष आवडणाऱ्या शेजारच्या जोशी काकू ह्या प्रत्येकाला आपल्या घराशेजारील काकूच वाटायच्या. मग बंटी नावाचा कुत्रा आला आणि चिंटूचा परिवार अधिकाधिक लोकप्रिय होत गेला.
सुरवातीच्या काळात चिंटू ही मालिका फक्त लहान मुलांसाठीच आहे असं लोकांना वाटायचं त्यामूळे लोक भेटले की आमचा लहान मुलगा तुमचं चिंटू आवडीनं वाचतो, आमचा मुलगा शाळेची रिक्षा आली तरी चिंटू वाचल्याशिवाय रिक्षेत बसत नाही, तसच तुमच्यामुळे आमचा मुलगा मराठी वाचतो अस ही इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलाचे पालक उत्साहाने सांगत. पण ते आम्हीही आवडीनं वाचतो हे सांगण्यात त्यांना संकोच वाटायचा. ही प्रतिक्रिया पुढे बदलली, याबाबत एका आजोबांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. सोलापूर मधील कर्माळा जिल्ह्यातून त्याचं पत्रं आलं. त्यांनी लिहिलं होत, " मला नातवंडांची खूप हौस होती. आता मला माझा नातू मिळाला." ही प्रतिक्रिया खुप उत्साह वाढवणारी होती. तसेच चिंटू मुळे आम्हाला अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलावणी यायची तेव्हाचे अनुभव देखील खूप भावस्पर्शी होते. एकदा गांधीभवन येथील अंध मुलींच्या शाळेत स्नेहसंमेलनाला बोलावलं होत. शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की यांच्यासाठी आम्ही वर्तमानपत्र वाचायला घेतो तेव्हा त्या सर्वात प्रथम चिंटू वाचायचा आग्रह करतात. एवढंच नाही तर या अंध मुलींनी स्टेजवर काही चिंटूचे विनोद सादर करून दाखवले. हे पाहून आम्ही खरंच अवाक झालो. तसाच आणखीन एक वेगळा अनुभव म्हणजे काही डॉक्टर्सनी आम्हाला सांगितलं की आम्ही चिंटूची पुस्तक पेशंटना वाचण्यासाठी म्हणून खास हॉस्पिटल मध्ये ठेवली आहेत. त्यांच्या वरचा ताण दूर होण्यासाठी त्याची खूप मदत होते.
आणखीन एक अनुभव आम्हाला चिंटू बनवल्याचं सार्थक झालं असं वाटायला लावेल असाच होता. पण त्यावेळी मनात शंका होती असाच चांगला अनुभव येईल का आणखीन काही विपरीत अनुभव येईल ? १९९४ साली आपले सर्वांचे लाडके पु ल देशपांडे यांचं निधन झालं त्यावेळीस त्यांना आदरांजली देण्यासाठी आम्ही चिंटूचा वापर केला. खरतर त्यांच्या सारख्या व्यक्तिमत्वा बाबत आदरांजली अश्याप्रकारे देणं हे धाडसाचं होत. पण या चिंटूवर प्रचंड प्रतिक्रिया आल्या आणि त्या खूपच चांगल्या आल्या. त्या अशा की, " पुलंच्या निधनाने आम्हाला खूप वाईट वाटलं होत पण चिंटू पाहिला आणि टचकन डोळ्यातून पाणी आलं. इतके वर्ष चिंटू आम्हाला हसवत होता, आज त्यानं आम्हाला रडवल. " खूप मोठमोठ्या लोकांनी या चिंटूची प्रशंसा केली.
यासाऱ्यापेक्षा एक गमतीशीर अनुभव आम्हाला बऱ्याचवेळा यायचा. आमची भेट झाल्यावर पालक आपल्या मुलांना अगदी कौतुकाने सांगायचे की, " हे बघ हे काका ना चिंटू करतात. " तो मुलगा अगदी म्हणजे सहा-सात वर्षांपेक्षा लहान असला तरी आमच्याकडे निर्विकारपणे बघायचा. त्याच्या डोळ्यातला निरागस प्रश्न आम्हाला स्वच्छपणे दिसायचा. " यांचा चिंटूशी काय संबंध ? चिंटू तर खराखूराच आहे, मग हे तो करतात म्हणजे नक्की काय करतात ? " या निरागस प्रतिक्रियांची आम्हाला सवय झाली होती मी आणि प्रभाकर मिळून यावर खूप हसायचो. काही वेळा पालकही अगदी स्वाभाविकपणे म्हणायचे की, "तुम्ही काय आमच्या घरात हळूच डोकावुन जाता का ? काल आमच्या घरात अगदी असाच प्रसंग घडला."
चिंटू करता दहा वर्ष कशी निघून गेली ती कळलीच नाही. या दशकपूर्तीच्या निमित्ताने सकाळ आणि आम्ही मिळून चिंटूचे एक भव्य प्रदर्शन गणेश कला क्रीडा मंदिरात भरवले होते. त्यावेळेस तर गर्दीने उच्चांक मोडला होता. खूप वेळ रांगेत उभं राहून पण लोक प्रदर्शन पाहून जात होते. २००१ साली झालेल्या या प्रदर्शनाची मांडणी देखील आम्ही आगळ्यावेगळ्या पद्धतीने केली होती. यात चिंटूच्या घराचा सेट उभा केला होता. चिंटू आणि त्यामधील सर्व पात्रांचे कॅरेक्टर्स उभे केले होते. चिंटूचे बाक तयार केले होते त्यावर बसून मुलं फोटो काढून घेत होती. त्यावेळीस आजच्या सारखे स्मार्ट फोन नव्हते नाहीतर अगदी धुव्वा उडाला असता. इतका छान प्रतिसाद मिळाला. चिंटूचा प्रवास २००२ पर्यंत दैनिक सकाळ मधून चालू होता. नंतर तो दैनिक लोकसत्ता मधून सुरु झाला. येथेही चिंटूला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रभाकरलाही माहेरी आल्याचा आनंद झाला होता. त्याच्या नोकरीतील सोनेरी वर्षे त्याने इंडियन एक्सप्रेस समूहात घालवली होती. डॉक्टर . . . . . . . . . . , कुमार केतकर यांनी चिंटू उचलून धरला.
२००५ पासून चिंटूच सकाळ मध्ये पुन्हा पुनरागमन झालं. त्यानंतरही चिंटू मालिके मध्ये सतत वेगवेगळे प्रयोग होत राहिल्याने तो लोकप्रिय राहीला. तसं पाहता चिंटूचा मिळालेला कॅनव्हास अगदी मर्यादित होता तीन कॉलम बाय पाच सें. मी. इतक्या लहान जागेत वाचकांना आकर्षित करायचं हे काम अगदी सहज शक्य नसायचं. साधारणपणे तीन फ्रेम मध्ये चिंटू असायचा. पण कधी कधी तो एका फ्रेम मध्ये ही चित्रित केला जायचा, उदा. पु ल देशपांडे यांचं निधन झालं तेव्हा तो सिंगल फ्रेम मध्येच होता. तसच चिंटूचा वाढदिवस या प्रसंगातही तो एका फ्रेम मध्येच चित्रित केला गेला होता. आईबाबा केक कापत आहेत, चिंटूचे सगळे मित्र गोळा झाले आहेत ते तोंडाने हॅपीबर्थडे जरी म्हणत असले तरीही त्यांचं लक्ष हे मागे ठेवलेल्या खाद्य पदार्थांकडेच आहे. क्वचित प्रसंगी चिंटू शब्दविरहीत केला गेला तर कधी चित्र विरहित ही केला गेला. उदा, लाईट गेले आहेत, त्यामुळे चित्रात काळ्या रंगाचा वापर केला आहे आणि फक्त संवाद तेव्हढे लिहिले गेले आहेत अशा निरनिराळ्या गंमतीजंमती केल्या आहेत. निवडणुकीच्या काळात मुलांचा त्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल ते दाखवले आहे. कधी चिंटू प्रसंगानुसार पाच फ्रेम मध्येही दाखवला आहे. आजूबाजूच्या वातावरणाचं प्रतिबिंब हे चिंटूच्या बालसुलभ कृतीतून जाणवायचं आणि ते सतत दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. केवळ सरळ मार्गी एकाच पद्धतीने चितारलेली हास्यमालिका असं तिच्याकडे न पाहता एखादा चित्रपट-दिग्दर्शक त्याच्या कॅमेऱ्यातून जसा पाहतो तसा दृष्टीकोनाचा वापर ह्या हास्यचित्र मालिकेत केला गेला. उदा. कधी टॉपव्ह्यूचा शॉट वापरला गेला, तर कधी चेहऱ्यावर फ्लॅश मारतात तसा इफेक्ट विनोद निर्मितीसाठी वापरला गेला. कमीतकमी शब्द, कमी फ्रेम यामध्ये दृश्यात्मक दृष्ट्या तो कसा आनंददायी राहील याचा सतत विचार केला गेला आहे. चिंटूच्या सुरवातीच्या काळात दूरदर्शन हेच केवळ एकमेव चॅनेल होत आणि डायल चे फोन होते. पण जशी जशी आजूबाजूची परिस्थिती बदलत गेली जशी हजारो चॅनेल्स आली , कॉम्प्युटर्स आले, इंटरनेट आलं, मोबाईल फोन आले मग स्मार्ट फोन आले असे तांत्रिक बदल चिंटूने सामावले अनुभवले. तो कालसापेक्ष बदलत राहिला आणि असं करता करता चिंटूला आता २१ नोव्हेंबर २०१६ रोजी चक्क पंचवीस वर्षे पूर्ण होणार आहेत. प्रभाकरच चिंटू परिवारात नसणं हे एक दुःख सोडल्यास चिंटूची आतापर्यंत ची कारकीर्द ही यशस्वी अशीच आहे.
ह्या २५ वर्षात चिंटू हा केवळ वर्तमानपत्रातील एक हास्यमालिका म्हणून न राहता त्याचा प्रवास अजूनही वेगवेगळ्या माध्यमातून झाला आहे. चिंटूची वर्तमानपत्रात येण्यापूर्वी ३० पुस्तक प्रकाशित झाली आहेत. अमृत पुरंदरे या आमच्या मित्राने ती पुरंदरे प्रकाशनच्या नावाने छापली होती. ती पुस्तक आजही लोकांनी जपून ठेवली आहेत. तसाच चिंटू हा कन्नड भाषेत देखील छापला जात होता. विजय कर्नाटका वर्तमानपत्रात तो छापला जायचा तेव्हा विरुपाक्ष कुलकर्णी त्याच भाषांतर करायचे. त्यालाही उत्तम प्रतिसाद होता. मुळात चिंटूला आडनाव नाही त्यामुळे जात- पात किंवा अगदी प्रांत आणि भाषेचाही अडसर त्याला आला नाही तो पुणेकरांना त्यांचा वाटायचं तसाच कोल्हापूरकर यांनाही त्यांचा वाटायचा. तो प्रत्येकाला आपला वाटायचा आणि तो असाच भारतीय मुलगा वाटावा अशी आमची इच्छा होती ती पूर्ण झाली. चिंटूचं संस्कृत भाषेतही पुस्तक आलय. संस्कृत भारती ही गोव्याची प्रकाशन संस्था आहे त्यांनी ते काढलय. मुंबई युनिव्हर्सिटी च्या डिपार्टमेंट ऑफ जर्मन यांनी परदेशी लोकांना मराठी शिकण्यासाठी जे पूस्तक काढलय त्यात चिंटूच्या दहा मालिकांचाही समावेश केलेला आहे.
चिंटूचा सिनेमाही येउन गेलाय, तोही खूपच लोकप्रिय ठरला होता. त्याची निर्मिती मागची कथा थोडक्यात अशी कि चित्रपट बनवण्याचं आमच्या मनात खूप होत पण त्याही आधी त्याच ऍनिमेशन करावं असं आम्हाला वाटत होत पण ऍनिमेशनसाठी लागणार बजेट पाहता तिकडे न जाता त्याची लाईव्ह ऍक्शन फिल्म बनवावी असं ठरलं. यासाठी इंडियन मॅजिक आय चे श्रीरंग गॊडबोले यांनी साहाय्य केलं आणि त्याची निर्मिती झाली. त्याच्या ऑडिशन साठी खूप मूलं आली होत, चिंटूवरच हे मुलांचं प्रेम पाहून तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. मूळ स्क्रिप्टशी तडजोड न करता त्यांनी ह्या चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि यशस्वी पार पडली. या सिनेमाच्या पहिल्या शॉटच्या वेळी आम्हाला लांबून येताना चिंटू, बगळ्या, राजू अशी सर्व पात्र त्यांच्या गेटअप मध्ये समोर वावरताना दिसली. ते पाहून आम्हाला खुपच थ्रिलिंग वाटलं. आपण कल्पनेनी बनवलेली पात्र समोर जिवंत झालेली पाहताना एक वेगळाच अवर्णनीय आनंद होत होता. या सिनेमाला संदीप खरे - सलील कुलकर्णी यांचं संगीत लाभलेलं होत. त्यातील एकटी एकटी हे गाणं मला विशेष भावलं होत. या यानंतर चिंटूचा भाग दोन चित्रपटही प्रदर्शित झाला. हा ऍडव्हेंचर स्टोरीचा हॉलिवूड टाईप ट्रीटमेंट दिलेला चित्रपटही चांगला चालला.
सध्या चिंटू आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फसेबूक वर आहे त्यालाही ३ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यातही सोशल अवेअरनेस आणण्यासाठी काही प्रयोग केले आहेत. उदा. वृक्ष लावा हे सिंगल फ्रेम मध्ये केल आहे. त्यालाही उत्तम प्रतिसाद आहे. तसच चिंटूच्या ऍनिमेशन फिल्म वरही काम चालू आहे. चिंटूचं यूट्यूब चॅनेल चालू करण्याचं विचार आहे. मकरंद केळकर या मित्राच्या साहाय्याने चिंटूची शालेय वर्षाची दोन कॅलेंडर्स छापली आहेत. चिंटूच्या २५ व्या वर्षीच्या पदार्पणाच्या वेळी केलेल्या प्रदर्शनात चिंटूचे मग्ज ठेवले होते त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात चिंटूची आणखीन ही प्रॉडक्ट्स काढण्याचा विचार आहे. जेणे करून चिंटू अधिकाधिक घरात पोहचला जाईल आणि वाचकांच्या मनात कायम घर करून राहील.

Comments
Post a Comment